३ मित्रांनी उघडली SBI ची बनावट शाखा, एक जण बँकेतील कर्मचाऱ्याचा मुलगा, ‘असं’ फुटलं बिंग..

तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे याची देशात चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची बनावट शाखा उघडली. यामुळे त्यांच्या युक्तीला सलाम करावा की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका अकल्पनीय गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोपाखाली पनुर्ती येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही मागच्या तीन महिन्यांपासून भारतीय स्टेट बँकेची बनावट ब्रँच चालवत होते. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोणालाही याबाबत माहिती नव्हती.

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या मुलांपैकी एकजण हा माजी बँक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. जवळपास तीन महिने ही शाखा सुरू होती. मात्र अखेरीस त्यांचे बिंग फुटले आणि पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी कमल बाबू याने हा प्लॅन आखला होता.

कमल बाबूचे आई-वडील माजी बँक कर्मचारी आहेत. त्याच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याची आई दोन वर्षांपूर्वी एका बँकेतून निवृत्त झाली होती. दुसरा आरोपी हा पनुर्ती येथे एक प्रिटिंग प्रेस चालवतो. तिसरा आरोपी रबर स्टँप तयार करण्याचा व्यवसाय करतो.

दरम्यान, याबाबत स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने जेव्हा ही शाखा पाहिली आणि बँकेच्या खऱ्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडे याची तक्रार केली. तेव्हा याबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे अधिकारीसुद्धा अवाक् झाले. त्यानंतर कारवाईची पुढील सूत्रं हलली.

याठिकाणी आधीच एसबीआयच्या दोन शाखा असतानाही या आरोपींनी आणखी एक शाखा उघडली. जेव्हा याबाबतची माहिती समोर आली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपींची चौकशी करून त्यांना अटक केली.