छत्रपती संभाजीनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे ही घडली आहे.
हे चारही मुलं 12 ते 14 वयोगटातील होती. ही मुले गुरुवारी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला.
बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्यय (12), अबरार जावेद शेख (12), अफरोज जावेद शेख (14), अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एका 14 वर्षीय मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने पालकांनी तेथे जाऊन पाहिले.
तेव्हा तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली. नंतर त्यांचा शोध घेतला गेला. रांजणगाव (शेणपुंजी) येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला.
त्यांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आणण्यास मदत केली. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलीस देखील याठिकाणी आले होते.
दरम्यान, या मुलांना पाण्याचा अंदाज आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. कुटूंबाचे घटनेनंतर एकच हंबरडा फोडला.