झारखंडच्या रांचीमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बैलाला वाचवायला गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीपासून ७० किलोमीटर लांब असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पिस्का गावात ही घटना घडली असून ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच गावातील आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर बचाव पथकाने तिथे येऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहे.
सध्या त्या भागात खुप पाऊस सुरु आहे. त्यामुळे माती ओलसर झाली होती. अशात एक बैल मातीवरुन घसरुन विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी ९ जण विहिरीत उतरले होते. दोरीच्या साहाय्याने त्याला ते बाहेर काढत होते.
तितक्यात माती कोसळली आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली नऊजण अडकले. त्यानंतर तातडीने तिथे बचावपथक आले. त्यांनी मदत कार्य सुरु करत ३ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले. तर सहाजणांचा मात्र या घटनेत मृत्यू झाला आहे.
मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे रात्री १ वाजता बचावपथकाला त्यांचे कार्य सुरु करावे लागले होते. यात त्यांनी विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवलं. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे समोर आले आहे. पण या घटनेमध्ये त्याने आपल्या वडिलांना गमावलं आहे.
माझे वडील शेतात काम करत असताना माझा लहान भाऊ माझ्या वडिलांकडे गेला होता. त्याने सांगितलं की बैल विहिरीत पडला आहे. त्यानंतर वडील तिथे गेले. त्यानंतर मी पण तिथे गेलो. आम्ही बैलाला काढण्यासाठी पाण्यात उतरलो पण मातीचा ढिगारा आमच्यावर कोसळला, असे विक्रांत मांझीने सांगितले आहे.