उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका आश्चर्यकारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे, जिथे एका महिलाने भिकाऱ्यासोबत पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. 45 वर्षीय राजूने याप्रकरणी आपल्या पत्नी राजेश्वरी आणि भिकारी नन्हे पंडितविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
राजू आपल्या पत्नी आणि सहा मुलांसोबत हरदोईत राहत होता. त्याच भागात नन्हे पंडित नावाचा भिकारी नियमित भीक मागण्यासाठी येत असे. राजूच्या पत्नीशी त्याचे संभाषण वाढले आणि नंतर फोनवरही संपर्क सुरू झाला, असे राजूने पोलिसांना सांगितले.
३ जानेवारीला राजेश्वरी दुपारी घरातून बाजारात जात असल्याचे सांगून निघाली, परंतु ती रात्री उशिरापर्यंत परतली नाही. शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. यावेळी राजूला संशय आला की ती नन्हे पंडितसोबत पळून गेली असावी, विशेषतः कारण काही दिवसांपूर्वी घरातील म्हैस विकून आलेले पैसेही ती घेऊन गेली होती.
राजूने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे, ज्यात अपहरण किंवा जबरदस्तीने विवाह करण्याच्या उद्देशाने महिलेला नेल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
सध्या, पोलिस नन्हे पंडितचा शोध घेत आहेत, तर राजेश्वरीची सहा मुलं आईच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.