ना व्हायरस, ना कोणतं इन्फेक्शन; ५१ लोकांना एकाएकी टक्कल पडण्यामागचं खरं कारण आलं समोर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये ५१ लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.

तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा आहे. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवालानुसार पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अत्याधिक असल्याचे समोर आले आहे.

0त्वचा तज्ज्ञांना नायट्रेट, आर्सेनिक आणि लीडचे प्रमाण जास्त असल्याची शंका आली होती. बुलढाणा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, तपासणीत नायट्रेटचे प्रमाण ५४ मिलिग्रॅम पर लीटर असल्याचे दिसून आले, जे मान्यतेच्या पाचपट आहे. तसेच, टीडीएस २१०० असल्यामुळे पाणी रासायनिक दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भोनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बोंडगावमध्ये महिलांचे, पुरुषांचे आणि मुलांचे केस गळण्याचे प्रकार समोर आले. यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण करण्यात आले. कठोरा गावातही रुग्णांचे सर्वेक्षण करून आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. डॉक्टरांनी गावकऱ्यांच्या शंकांचे निराकरण केले.