स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी बनावं असे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनतही घेत असतात. पण प्रत्येकालाच अधिकारी होणं शक्य होत नाही. त्यामुळे तरुण-तरुणी दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याचा विचार करतात. पण एका तरुणाने असे काही केले आहे की पोलिसांनी त्याला ताब्यातच घेतले आहे.
सोशल मीडियावर आयएएस ऑफिसर सांगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जबलपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्या तरुणाचे नाव राहूल गिरी असे असून आपण नरसिंहपुरचे कलेक्टर असल्याचे त्याने म्हटले होते.
राहूलने पदभार सांभाळतानाचे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याबाबत नरसिंहपूर कलेक्टर रिजू बाफना यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सोशल मीडियावर राहूल गिरी खुप चर्चेत होता. कारण त्याने गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच अनेक मंत्र्यांसोबतचे खोटे फोटो बनवून सोशल मीडियावर टाकले होते. एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करुन तो फोटो तयार करायचा आणि सोशल मीडियावर शेअर करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक नेत्यांसोबतचे फोटो त्याने एडिट करुन ठेवले होते, असे समोर आले आहे. राहूल हा मुळचा गोंदियामधील आहे. पण तो सध्या जबलपूरच्या एका घरामध्ये राहत आहे.
बीएससी झालेल्या राहूलला कलेक्टर बनायचे होते. पण अभ्यासात चांगला नसल्यामुळे त्याला अधिकारी होता आले नाही. त्यामुळे हौस म्हणून तो फोटो एडिट करुन आपण नरसिंहपूरचा कलेक्टर असल्याचे सांगायचा. त्याने नरसिंहपुरच्या कलेक्टरच्या फेसबूक अकाऊंटवरुन काही फोटो घेतले होते. त्यांना एडिट करुन त्याने आपला चेहरा तिथे लावला होता.
राहूलचा अमित शहांबरोबरचाही एक फोटो पोलिसांना भेटला आहे. त्यामध्ये तो अमित शहांसोबत चर्चा करत आहे. तोही खोटा असल्याचे समोर आले आहे. त्याच्या आईवडिलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. त्याने अधिकारी सांगून कोणाचा फायदा तर घेतला नाही ना? याचा तपास आता पोलिस करत आहे.