Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या मतदारसंघावर मिलिंद देवरांचे दावे आहेत. मात्र, उद्धव ठाकरे गटातील अरविंद सावंत यांचा या मतदारसंघात दबदबा आहे.
तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मागील आठवड्यामध्ये गिरगावमध्ये सभा घेत खासदार अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे देवरा नाराज असल्याचे बोलले जात आहे.त्यावेळी मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली.
पोस्टमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात मागील 50 वर्षांपासून काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. देवरांचे निकटवर्तीय मित्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मिलिंद देवरांच्या पक्ष प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
मिलिंद देवरा यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझी चिंता ही केवळ दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांबाबत नाही. तर ती सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप हे बरोबरीत झाले पाहिजे. माझ्या उमेवदारीबाबत काँग्रेस पक्ष योग्य तो निर्णय घेईल. शिंदे गट किंवा अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचारही केलेला नाही.” त्यामुळे या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.
दरम्यान, जर देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर, हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वळण ठरू शकते. कारण, देवरा हे एक अनुभवी राजकारणी आहेत आणि त्यांची दक्षिण मुंबई मतदारसंघात चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास, महायुतीला या मतदारसंघात विजय मिळवणे सोपे होईल.