Crime News: अकोला जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. तुरीचा दाणा श्वास नलिकेत अडकून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल गावात ही घटना घडली. योगीराज अमोल इसापुरे (वय वर्ष ३) असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. योगीराज हा आपल्या आजीसोबत घरी होता.
आजी तुरीचे दाणे काढत होत्या. योगीराज त्यांच्याजवळ गेला आणि त्याने आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे तोंडात कोंबले. त्यातले एक दाणा त्याच्या नाकात म्हणजेच श्वास नलिकेत अडकला गेला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची तब्येत बिघडली.
घरातले सर्वजण घाबरले आणि त्यांनी त्याला अकोटच्या रुग्णालयात नेले. परंतु, वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुःखत घटना अकोल्यातील दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीत एक घडली आहे.
योगीराज याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. संपूर्ण गावातील लोक यावर शोक व्यक्त करत आहेत. वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्यानं या चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अकोट तालुक्यातील पोलिसांनी गावात जाऊन जनजागृती केली. लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. लहान मुलांकडे नीट लक्ष द्यायला हवे, ते कोणतीही गोष्ट तोंडात टाकत नाहीत ना, हे तपासा, असे आवाहन या घटनेनंतर करण्यात येत आहे.