बंगळुरूच्या सूचना सेठ नावाच्या महिलेने तिच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यामुळे आता पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून तो या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगळुरूत डेटा सायंटिस्ट म्हणून काम करणाऱ्या सूचना सेठनं गोव्यातल्या एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये चेकइन केलं.
दोन दिवसांनंतर तिनं चेकआऊट केलं. पण येताना मुलासोबत आलेली सूचना सेठ जाताना मात्र एकटीच गेली. शिवाय गोव्याहून बंगळुरूसाठी तिनं विमान सोडून कॅबने प्रवास केला. कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
नंतर सर्व गोष्टींची छाननी केल्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला कर्नाटकच्या चित्रदुर्ग परिसरातून अटक केली. तिच्याबरोबर मोठी बॅग होती आणि त्या बॅगेत तिच्याच चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आता सूचना सेठ थांबली होती त्या अपार्टमेंटच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. सूचना सेठच्या खोलीत पोलिसांना एक चुरगळलेला टिश्यू पेपर सापडला. त्यावर पाच ओळी लिहिल्याची माहिती आहे.
हे सूचना सेठनंच लिहिलं असावं, असा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी पोलिसांनी ही चिठ्ठी हस्तलेखन तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवली आहे. यामध्ये न्यायालयाने तिच्या पतीला मुलाला भेटण्याची परवानगी दिल्याबद्दल नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.