देशातील बड्या देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक झाली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकतात. मात्र, याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानतर खळबळ उडाली आहे.
याबाबत संस्थानमध्ये एक पत्र आले होते. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची बनावट पावती देत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यामुळे याबाबतचा तपास सुरू होता.
याबाबत कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईभक्त व साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
यामध्ये अजून कोण कोण आहे, याचा देखील पोलीस तपास करत आहेत. आरोपीला अजून कोणाची साथ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आत्तापर्यंत किती लोकांना अशा पद्धतीने बनावट पावत्या देण्यात आला याचा तपास सुद्धा आता पोलीस करणार आहेत.
दरम्यान, याबाबत आगामी काळात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून सध्या कसून चौकशी सुरू आहे. पोलिस निरीक्षक एस. पी. शिरसाठ यांनी याबाबत माहिती दिली.