धाराशिवमध्ये उमरग्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत ओमराजे निंबाळकर यांनी भाषण करताना लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयाची हमी दिली. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी ते म्हणाले, माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मला पदरात घेतले. त्यावेळी ते म्हणाले होते की, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही माझ्यावर कायम प्रेम केले. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. यामुळे मी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे.
सध्या 40 आमदार शिवसेना सोडून गेले असले तरी आमच्या शिवसैनिकांमध्ये 80 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, असेही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो.
मध्यंतरी एका महिलेने एसटीत सीट मिळत नाही, म्हणून मला फोन केला होता. तिने कंडक्टरला फोन दिला तेव्हा ओमराजे निंबाळकर बोलतोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. शेवटी मी व्हीडिओ कॉल केला तेव्हा कुठे त्याचा विश्वास बसला, असेही ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या लोकांना एका मतासाठी 50 हजार रुपये देण्यात आले. पण आपले लोक हलले नाहीत. उलट त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या उमेदवारांना खर्च करण्यासाठी दिले, असे शिवसैनिक आपल्याकडे आहेत. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपण फक्त सेल्फी काढणारी लोक मोजली तरी मला 6 लाख मतं पडतील, आमच्यात 40 चे 80 आमदार करण्याची ताकद आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते.