सध्या लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. यामुळे उमेदवारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेर आज नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजगुरूनगर येथील पक्ष मेळाव्यात केली आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठांच्या संमतीने आढळरावांना पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत आहे. या जागेसाठी दिलीप वळसे पाटील, नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे या सगळ्यांच्या बाबतीत विचार झाला.
आढळराव पाटील यांचे नाव अखेर ठरले आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या विचारांचा आणि केंद्रात सत्ता असलेल्या प्रतिनिधींचा फायदा विकास कामे करायला होतो. हलक्या कानाचे होऊ नका. आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करून आता पक्षात घेण्याचे व उमेदवारी देण्याचे ठरले आहे. असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज अजित पवार यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आढळराव पाटील यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेत होते.
यामुळे आता याठिकाणी शरद पवार यांच्या गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्याकडून आढळराव पाटील हे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात कोण निवडणूक येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.