काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यामुळे आता अजित पवारांचा गट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागला आहे.
अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे. अजित पवारांनी आमदारांना देखील मोठा निधी दिला आहे. यावरुन शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.
आता अजित पवार गटाकडून आपले जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी भेट दिली जाणार आहे. या सगळ्यांना महागड्या गाड्या देण्यात येणार आहेत. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी दादांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना या गाडीचा वापर करता येईल. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार आहे.
आता अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे. अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्षकार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची दिवाळीच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच नेते आणि पक्ष कामाला लागले आहेत.