भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धोनीचे करोडो फॅन्स आहेत. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी आता या फॅन्सना टार्गेट केले आहे. याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात चक्क महेंद्रसिंग धोनीच्या नावाने पैसे मागण्यात आले आहेत. ही धोनीचीच पोस्ट असल्याचे भासवण्यासाठी पोस्टमध्ये धोनीचा फोटोही लावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा स्लोगनही देण्यात आले आहे. यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
या पोस्टमध्ये फॅन्सकडून सहाशे रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पोस्टमध्ये धोनी म्हणतोय की, मी रांचीत फसलो असून माझ्याकडे माझं पाकिट नाहीये.
तसेच मला घरी जाण्यासाठी मला 600 रुपयांची गरज आहे. फोनपेवर मला पैसे पाठवा. पोहोचल्यावर मी पैसे परत करेल, असा मेसेज पाठवण्यात येत आहे. महेंद्रसिंग धोनीचे mahi7781 हे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आहे. फेक पोस्टमध्ये दावा खरा वाटण्यासाठी धोनीचा फोटोचाही वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, व्हायरल करण्यात आलेली ही पोस्ट फेक असून यावर कोणीही विश्वास ठेऊ नये आणि पैसे पाठवू नयेत, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
भावनेच्या भरात निर्णय न घेता खबरदारी बाळगावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सध्या देशात मोबाईलचा वापर जितका वाढला आहे, त्या पेक्षा जास्त प्रमाणात ऑनलाईन फसणवूकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. रोज याबाबत घटना समोर येत आहेत.