पत्रकार परिषदेत खेकडा दाखवणे आले अंगलट, रोहित पवारांवर कारवाईची मागणी, नेमकं झालं काय?

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा दाखवून त्याचा गैरवापर केल्याबद्दल ‘पेटा इंडिया’ संस्थेने (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) आक्षेप घेतला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, असे पत्र ‘पेटा’ने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पाठविले आहे. यामुळे आता रोहित पवार यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच पशुवैद्यकीय सेवा व पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला आमच्याकडे सुपूर्द करण्याची विनंतीही रोहित पवार यांच्याकडे पेटाने केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता, मुख्य निवडणूक कार्यालयाने निवडणूक प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करण्यास मनाई असल्याचा आदेश काढला आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० (प्रिव्हेंशन ऑफ ॲनिलम क्रूएल्टी ॲक्ट) यांचे रोहित पवार यांनी उल्लंघन केले असल्याचा ‘पेटा इंडिया’चा आक्षेप आहे. यामुळे आता रोहित पवार याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांनी खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राण्याला विनाकरण दुखावले गेले. त्याला त्रास देण्यात आला, हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे पत्रात म्हटले आहे.