प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्यामुळे लोखंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शशिकांत लोखंडे यांच्यावर रविवारी मुंबईतील ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान अंकिता लोखंडेनेही आपले कर्तव्य पार पाडत वडिलांच्या अर्थीला खांदा दिला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही आला आहे.
वडिलांच्या निधनामुळे अंकिताला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी अंकिताचा पती विकी जैन तिला सावरताना दिसतला. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अंकिता आपल्या आईला मिठी मारून रडताना दिसत आहे.
शशिकांत यांच्या जाण्याने अंकिताच्या आईलाही मोठा धक्का बसला. त्यामुळे अंतयात्रेमध्ये अंकिता आपल्या आईचा हात धरुन चालताना दिसत होती. अभिनेत्री श्रद्धा आर्य, आरती सिंह, रुही चतुर्वेदी, नंदिश संधू हे देखील अंकिताच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. यावर्षी फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांसोबतचा एक व्हिडिओ तिने शेअर केला होता. त्यामध्ये तिने वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, अंकिता लोखंडे ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही सीरियलमधून अंकिताला ओळख मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये मणिकर्णिका या चित्रपटात काम करत तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.