तेलंगणातील हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने बिर्याणीसाठी जादा रायता मागितल्याने वाद झाला. प्रकरण इतके वाढले की काही कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला मारहाण केली. त्याला इतका मार लागला की त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, मारले गेलेला तरूण 30 वर्षांचा असून तो चंद्रयांगुट्टा येथील रहिवासी होता. तरुण आपल्या तीन मित्रांसोबत पुंजागुट्टा एक्स रोड परिसरातील मेरिडियन हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. जिथे रायत्यावरून वाद झाला.
पोलिसांनी सांगितले की, बिर्याणी खाताना ग्राहक आणि हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांमध्ये त्याने जादा रायता मागितला तेव्हा बाचाबाची झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आणि रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाद वाढत गेल्यावर दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्याने पंजागुट्टा पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.
अधिकाऱ्याने सांगितले की, मारहाणीनंतर ग्राहकाला फारशी दुखापत झाली नाही, परंतु त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो पोलिस ठाण्यातच कोसळला. पोलिसांनी सांगितले की, त्याला नंतर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.