Mitchell Starc : विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नशीब नेहमीच खराब होते. या विश्वचषकावरच नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर येऊनही स्पर्धेबाहेर आहे.
विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दक्षिण आफ्रिका संघ १९ नोव्हेंबरला रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या फायनलकडे पाठ फिरवणार आहे.
याबाबतची घोषणा दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी शुक्रवारी केली. ते स्वत: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारी अंतिम लढत बघणार नाही. या मैदानावर सलग दहा लढती जिंकणारा भारत आणि सलग आठ लढती जिंकणारा ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने येणार आहे.
साखळीत भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज लोळविले होते, तर साखळीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. मात्र, उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २१२ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य ४७.२ षटकांत पूर्ण केले.
यानंतर वॉल्टर म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगू तर, मी फायनल बघण्याची शक्यता नाही. खरे सांगू तर फायनलमध्ये काय होते, याच्याशी मला काही देणेघेणेच नाही.” वॉल्टर यांच्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचे चाहतेही या फायनलवर बहिष्कार टाकणार असल्याचे समोर येत आहे.
वॉल्टर यांना हा वर्ल्ड कप भारताने जिंकावा असे वाटते आहे. ते म्हणाले, ‘वर्ल्ड कप भारतात होत आहे. तेव्हा यजमान देशाने वर्ल्ड कप जिंकावा, असे वाटते. अर्थात, ऑस्ट्रेलियाच्या गोटात आता माझे अनेक मित्र झाले आहेत. खासकरून प्रशिक्षक वर्गात.
तेव्हा त्यांच्यासाठी एक कोपरा हळवा नक्कीच आहे. मात्र, भारतात आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा संघ सर्वोत्तम आहे. ते सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहेत, तेव्हा भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा.’