अमित शहांनी महामुर्खपणा केलाय, ते संसदेत खोटं बोलले; ‘या’ कारणामुळे भडकले बच्चू कडू

आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. कारण ते सरकारमध्ये असूनही काही ठिकाणी सरकारविरोधी भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती, पण अजूनही त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

मंत्रिपदाबद्दलची भूमिका बच्चू कडू यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलूनही दाखवली आहे. पण दोन वेळा विस्तार होऊनही त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. अशात त्यांनी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अमित शहा यांनी संसदेत कलावती यांच्यावर भाष्य केलं होतं. पण कलावतींनी ते सर्व खोटं असल्याचे सांगितले. त्यामुळे अमित शहांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता यावर बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

कलावती यांच्याबाबतीत पहिला मुर्खपणा राहूल गांधी यांनी केला. त्यानंतर त्यापेक्षाही मोठा मुर्खपणा अमित शहा यांनी केला. ते लोकसभेत जे काही बोलले ते सर्व खोटं बोलले. त्यांनी विचार करुन बोलायला हवं. शहांच्या वक्तव्यांमुळे भाजप अडचणीत येत आहे. भाजप प्रत्येकवेळेस खोटं बोलते, असे त्यातून दिसत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

एका कलावतीला राहूल गांधी यांनी घर बांधून दिले होते. त्याचा त्यांनी देखावा केलाय. पण तेव्हा तुमचंच सरकार केंद्रात आणि राज्यात होतं. कोट्यवधी लोक घरासाठी बाजूला रांगेत उभे राहतात. अशात एका व्यक्तीच्या घरी जाऊन राजा उदार होत असेल आणि बाकीच्यांना भोपळा देत असेल तर त्याला आमचा विरोध आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहूल गांधी कलावतींच्या घरी जाऊन आले, जेवण करुन आले. पण त्यांना वीज, अन्न नरेंद्र मोदी सरकारने दिलं होतं, असे अमित शहा यांनी संसदेत म्हटले होते. पण नंतर कलावतींनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, राहूल गांधींनी मला मदत केली. भाजपने मला काहीही दिले नव्हते.