कुठेही साप आढळून आला तर पहिल्यांदा सर्पमित्राला बोलावले जाते. तो सर्पमित्र सापाला जंगलात सोडून येतो. सापाला सुखरुपपणे जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. त्यामुळे अनेक सापांचा जीवही वाचतो.
अशात बारामतीमधील लोणी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सापांना वाचवणाऱ्या एका सर्पमित्राचा एका सापामुळेच मृत्यू झाला आहे. सर्पमित्राला विषारी नाग चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
हजारो सापांना जीवनदान दिल्यानंतर एका सापामुळेच त्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय यादव असे त्या सर्पमित्राचे नाव होते. ते लोणी भापकर येथील रहिवासी होते.
१५ ऑगस्टला ते साप पकडण्यासाठी सुपा जवळच्या खराडवाडी येथे गेले होते. जनावरांसाठी बनवलेल्या खड्ड्यामध्ये नाग होता. त्याला पकडण्यासाठी ते तिथे गेले होते. नागाला पकडत असताना विषारी नागाने त्यांना दंश केला होता.
दंश केल्यामुळे ते जखमी झाले होते. तरी त्यांनी त्या नागाला पकडून एका सुरक्षित रानामध्ये त्याला सोडून दिले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. १६ ऑगस्टरोजी त्यांची प्रकृती सुधारली होती.
अशात अचानक विजय यादव यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. गेल्या ३० वर्षांपासून ते सर्पमित्र म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी ते कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाही. शेतात साप निघाला तरी शेतकरी त्यांना बोलवायचे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही ते खुप खास बनले होते. पण या घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.