पुन्हा मोठी दुर्घटना! पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, लोखंडी होर्डिंग कोसळले, गाड्यांचा अक्षरशः भुगा…

मुंबईत तीन दिवसांपूर्वी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. यामुळे विना परवाना होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकल नाही. मात्र सध्या याबाबत कारवाई होणे आवश्यक आहे.

दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नाही. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवारपासून (ता.१५) सुरुवात केली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसामध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यास पालिकेने सांगितले आहे. दरम्यान मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे लवकरात लवकर याबाबत माहिती घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे.

मुंबईत झालेली घटना सध्या ताजी आहे. तेथील फरारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या होर्डिंगची आशिया खंडात नोंद झाली होती, ते सर्वात मोठे हिर्डिंग होते. मात्र यावर कारवाई का झाली नाही, याबाबत कोणालाही तपास नव्हता. यामुळे याबाबत कोणालाही काळजी नसल्याचे दिसून येत आहे.