लाडक्या बहिणींना मोठी गुडन्यूज; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत केली मोठी घोषणा

राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते योजनेला गेमचेंजर मानत आहेत आणि यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचा दावा करत आहेत. मात्र, सोशल मीडियावर योजनेच्या निकषांमध्ये बदल होत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महिला व बालविकास विभागाने याबाबत स्पष्ट केलं आहे की, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. माजी मंत्री व आमदार आदिती तटकरे यांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत या विषयावर स्वतः लक्ष ठेवत असल्याचं सांगितलं आहे. या स्पष्टीकरणामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे. महिलांना अपात्र ठरवण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये बदल होत असल्याचे मेसेज फिरत होते. मात्र, महिला व बालविकास विभागाने हे सर्व मेसेज खोटे असल्याचं सांगत अपप्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.

विवादास्पद वक्तव्यावर प्रतिक्रिया
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी तीन अपत्य असलेल्या मुस्लिम महिलांची लाडकी बहीण योजना रद्द करण्याची मागणी केली होती. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी, “देशात कायद्याचं राज्य असून, सर्व निर्णय संविधानाच्या चौकटीत राहूनच घेतले पाहिजेत,” असं म्हटलं आहे.

महिलांमध्ये समाधानाचा सूर
महिला व बालविकास विभागाच्या स्पष्टीकरणामुळे योजनेबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. सध्या तरी कोणत्याही निकषांमध्ये बदल नाहीत, त्यामुळे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.