सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. यामुळे आज रात्री पासून याठिकाणी टोल भरावा लागणार नाही.
शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री १२ वाजेपासून मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू नसणार आहे. याबाबत मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोल माफीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा आवाज उठवला होता. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निवडणूक झाल्यानंतर हा निर्णय लागू होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
सध्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारे निर्णय घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजना असेल टोल माफीचा निर्णय असेल यामुळे हे निर्णय राज्य सरकारला फायद्याचे ठरणार का? हे या विधानसभा निवडणुकीत समजेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. सध्या कधीही आचारसंहिता लागू शकते. तसेच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. यामुळे लवकरात लवकर निर्णय घेतले जात आहेत. आजही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.