मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागणीवर ते आजही ठाम आहेत. आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आता त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून मराठा समाज याठिकाणी दाखल होत आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, त्यांची तब्येत खालावली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री १ वाजेच्या दरम्यान सलाईन लावण्यात आले आहे. यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोलापूर मधील आमदार राजेंद्र राऊत हे काल रात्री १ वाजता जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते.
राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली. त्यांनतर राऊत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर सलाई लावले. यामुळे आता याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही, सरकारच्या वतीने आरक्षण विषय लवकर तडीस नेण्याचे आश्वासन मिळाले आहे. आमदार राऊत निरोप घेऊन आले होते. आश्वासन मिळाल्याने सलाईन लावले आहे. अस वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा बांधव मला भेटायला येत आहेत, त्यांनी इकडे येऊ नये. मराठा बांधवांनी इकडे गर्दी करू नये. शेतीची कामे उरकून घ्यावीत. मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी. सर्वांनी या आपल्या एकजुटीचा धसका घेतला आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय आता राज्यात पेटला आहे. लोकसभेला याचा मोठा फटका सत्ताधारी भाजपला झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा विषय मार्गी निघाला नाही, तर मात्र सरकारच्या विरोधात मराठा समाज अजून आक्रमक होण्याची शक्यता आहे.