सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आली सर्वात मोठी अपडेट, पोलिसांना सापडला तपासातील महत्त्त्वाचा धागा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओमध्ये अपहरण करून ठार मारण्यात आले. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, पुण्यातून प्रतीक घुले या आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान, बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे त्यांना निलंबित केले आहे. तसेच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ही घटना बीड जिल्ह्यासाठी गंभीर आव्हान बनली असून, आरोपींना लवकरात लवकर न्यायालयीन कारवाईसाठी हजर करण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे.