राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर झालेल्या या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.
यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षाने पाठबळ दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरु होता. पंकजा मुंडे यांनी वारंवार आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आले आहे. मात्र यामध्ये त्यांचा धक्कादायक पराभव झाला.
हा पराभव कार्यकर्त्यांच्या इतका जिव्हारी लागला की, अनेकांनी जीव दिले होते. आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून पाच उमेदवारांच्या नावाची घोषणी करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासह पाच जणांना संधी देण्यात आली आहे.
यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. तसेच इच्छुक असलेले महादेव जानकर यांना यावेळी धक्का देण्यात आला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत होते.
भाजपचं विधीमंडळातील संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. भाजप पंकजा मुंडे यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत पराभव झाल्याने पंकजा यांचं काय होणार? याबाबत चर्चा सुरू होती.
आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. जातीय समीकरण बघून त्यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे