तिकीट कापल्याने भाजप खासदार नाराज, थेट मातोश्रीवर येत लावली फिल्डींग, भाजपला धक्का…

सध्या राज्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरू आहे. अशातच जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले. त्यामुळे नाराज असलेल्या पाटील यांनी मुंबई येथे जाऊन ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

यामुळे ते ठाकरे गटात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरुन मतदारसंघात चर्चांना वेग आला आहे. खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे त्यांचे समर्थक देखील नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर काल भाजपतर्फे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यात उन्मेष पाटील यांची अनुपस्थिती जाणवल्याने चर्चेला उधाण आले आहे. यामुळे ते पक्षांतर करणार या चर्चेला जोर आला.

भाजपतर्फे बैठकीचा निरोप न मिळाल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील हे सध्या महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे गाठीभेटी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उन्मेष पाटील हे बाहेरगावी असल्याने त्यांचा मोबाईल बंद आहे. मी स्वतः त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन लागू शकला नाही. मात्र आपल्याला कोणाचाही कॉल आला नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.