गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेकजण सोडून जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार पण त्यांना सोडून गेले. असे असताना आता राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.
यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आयुष्याच्या उर्वरित प्रवासात सक्रिय राजकारणात सहभाग न घेता निवृत्त होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जळगावातील सुशील नवाल यांनी सुरेश जैन यांच्यामार्फत ही माहिती दिली. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
सुरेश जैन १९७४ पासून ४० वर्षे राजकारणात होते. १९८० पासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर ३४ वर्षे ते आमदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मार्जितले ते झाले होते. यामुळे एक विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
दरम्यान, जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात राहावे लागले. कारागृहातून बाहेर आल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय ठिकाणी जास्त सक्रिय झाले नाहीत. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेतच राहतील.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केला. मात्र आता त्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव मतदारसंघातून भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यासमोर ठाकरे गटाचे करण पवार हे लोकसभा निवडणुक लढवत आहेत.
आता अचानक जैन यांनी दिलेला राजीनामा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी सध्या लोकसभा निवडणुकीबाबत चुरस निर्माण झाली आहे.