पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपीसाठी पिझ्झा बर्गर मागवला अन्…

पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

तसेच कोर्टाने १७ वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्यास, मद्यपान सोडण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यास आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सांगितले आहे. कल्याणीनगर येथील एका भोजनालयात पार्टी करून मित्रांचा एक गट त्यांच्या मोटरसायकलवरून घरी परतत होता.

जेव्हा ते कल्याणी नगर जंक्शनवर पोहोचले तेव्हा एका वेगवान लक्झरी कारने एका मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे मोटरसायकलवरील दोन प्रवासी पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना धडकल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथच्या रेलिंगला धडकली, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातून समजेल, असेही ते म्हणाले.