हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणाने स्क्रु ड्रायव्हरने तरुणीवर हल्ला केला आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे त्याने असे केल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपी तरुणालाही ताब्यात घेतले आहे. आता पोलिस त्याची चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव शिवम असे आहे. गेल्या एक वर्षापासून तो एका तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघेही मुळ युपीचे आहेत. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहत होती.
शिवमसोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना तरुणीला त्याच्याबाबतची धक्कादायक गोष्ट कळाली. शिवमचे आधीच एक लग्न झाले होते. तसेच त्या लग्नापासून त्याला दोन मुलेही झालेली होती, असे तिला कळाले.
ते कळाल्यानंतर तिने शिवमची साथ सोडली. तिने नाहरपूर येथील एका घरामध्ये राहण्यास सुरुवात केली. शिवमला माहिती नव्हते की तिने नक्की कुठे घर घेतले आहे. पण त्याला ते माहिती झाल्यानंतर त्याने तिचे घर गाठले आणि तिच्यासोबत वाद घालू लागला.
तसेच त्याने तिच्याशी संबंध बनवण्याचेही प्रयत्न केले. पण तिने नकार दिल्यानंतर तो खुप संतापला. त्याने तिच्यावर थेट स्क्रु ड्रायव्हरने हल्ला केला. त्यानंतर ती घरातून बाहेर परिसरात आली. त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्या शिवमला ताब्यात घेतले आहे.