त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे.

यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजू शेट्टी यांना जागा सोडू असे बोलले जात होते. मी उमेदवार असल्याने पक्षातील नेत्यांना भेटावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे शेट्टी म्हणाले.

शरद पवार यांच्यासोबत देखील दूरध्वनीवरून मी चर्चा केली. कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि जयंत पाटील यांचीही भेट घेतली. निवडणुकीनंतर माझी भूमिका काय असणार या संदर्भात सतेज पाटील आणि जयंत पाटील यांनी माझ्याकडून ड्राफ्ट तयार करून घेतला.

असे असताना त्यांनी अचानक त्यांना जे करायचं तेच केलं आणि आपला उमेदवार जाहीर केला, त्यांनी माझी फसवणूक केली, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती.

याबाबत राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट देखील झाली. मात्र उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली चर्चा शेवटच्या क्षणी फीसकटली आणि महाविकास आघाडीने मशाल चिन्हावर माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिली.

दरम्यान, महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत चाव्या कोणी फिरवल्या माहीत नाही असे म्हणत राजू शेट्टी यांनी देखील एकला चलो रे ची भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढली. मात्र यामध्ये त्यांचा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला.

मत विभागणीचा फायदा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना झाला. यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीने थोडा हट्ट सोडला असता तर अजून एक उमेदवार विजयी झाला असता. याबाबत आत राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत शेतकरी देखील नाराज झाले आहेत.