Chhatrapati Sambhajinagar : अजितदादांचा शरद पवारांना धक्का; बड्या भाजप नेत्याला भिडणाऱ्या आमदारालाच लावले गळाला

Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर इनकमिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार सतीश चव्हाण उद्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा पक्षप्रवेश मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ देणार आहे.

सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांचा गट निवडला होता, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांची इच्छा गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची होती, पण महायुतीत ही जागा भाजपकडे गेल्यामुळे त्यांची स्थिती कठीण झाली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश करून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.

चव्हाणांनी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याविरुद्ध लढत दिली होती. भाजपकडून तीन वेळा विजयी झालेले बंब यांना यंदाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी आव्हान दिले, ज्यात ते केवळ ५,०१४ मतांनी पराभूत झाले. चव्हाण यांना १ लाख २० हजार ५४० मतं मिळाली होती, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांच्यावर ६ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, या कारवाईची मुदत ६ महिन्यांपेक्षा जास्त टिकली नाही. निवडणूक निकालानंतर अवघ्या दोन महिन्यांतच चव्हाण आता पुन्हा अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश उद्या शिर्डीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनादरम्यान होणार आहे.

सतीश चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यात आणि विशेषतः गंगापूर मतदारसंघात मोठे बळ मिळणार आहे. गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादीला यापूर्वी कधीही विजय मिळवता आला नाही, त्यामुळे चव्हाण यांच्या घरवापसीमुळे पक्षाची स्थानिक ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे.