मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिर सोहळ्यासाठी गैरहजर, कारण आले समोर

आज श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला.

यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले. हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा आहे. यासाठी मोठे दग्गज उपस्थित होते.

असे असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. ते म्हणाले, अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.

या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचे दर्शन आम्ही घेणार आहोत.

अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, आज अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. याठिकाणी अनेक बडे व्यक्ती उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी मंदिर निर्माण कामात उपस्थित असलेले कामगार यांच्या अंगावर त्यांनी फुले देखील टाकली.