Chiplun news : दारू पिऊन चॉकलेट खाण्याची सवय बेतली जीवावर, चॉकलेट समजून खाल्ली रेटॉल ट्यूब अन् भयानक घडलं

Chiplun news : दारू पिण्याचे व्यसन असल्यास कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका 58 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मकसुद हाजम भाई असे मृत्यू झालेला इसमाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मकसुद यांना दारूचे व्यसन होते. दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती. मात्र, ही सवय त्यांच्या थेट जीवावरती बेतली आहे.

मकसूद यांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दारू पिल्यानंतर चॉकलेट समजुन रेटॉल ट्यूब दारुच्या नशेत खाल्याने याचा त्रास त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ लागला. ६ नोव्हेंबर रोजी त्यांना अस्वस्थ होऊ लागल्याने व उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ चिपळूण शहरातील रुग्णालयात दाखल केले.

नंतर त्यांना पुणे येथे हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. नऊ नोव्हेंबर रोजी ज्युपीटर हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असताना विषारी पदार्थ सेवन केलेल्या या इसमाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

या प्रकरणाची नोंद चिपळूण शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत. मकसुद यांना दारूचे व्यसन होते. दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती, यामुळे दारू पिऊन काय होऊ शकते याचा अंदाज तुम्हाला येईल.

व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. अनेकदा याबाबत घटना समोर येत असतात. यामुळे अनेकांची कुटूंब उध्वस्त झालेली आपण बघितली आहेत.