मोठी बातमी! वाल्मिक कराड भोवतीचा फास सीआयडीने आवळला, तपासाला वेग

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर आता तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणात संशयित वाल्मिक कराड अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

कराड यांच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्या प्रकरणातही ते फरार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत, सीआयडीने त्यांच्या पत्नी मंजिली कराड यांची सखोल चौकशी केली आहे. सीआयडीच्या पथकाने बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये मंजिली कराड यांची दोन ते अडीच तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.

तपासाच्या संदर्भात मंजिली कराड यांची चौकशी महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

या प्रकरणात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी धनंजय मुंडे यांच्या पीआरशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यांना ओळखत होतो, त्यामुळे माझी चौकशी झाली. मात्र, माझा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही.”

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, वाल्मिक कराड यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीकडून प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.