शतकांचा पाऊस पाडत ‘या’ खेळाडूची जबरदस्त कामगिरी; चॅम्पीयन्स ट्राॅफीसाठी केला दावा, रोहितला पर्याय?

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांनी आता जोर धरला असून, प्रत्येक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. करुण नायरच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे विदर्भाने रविवारी राजस्थानवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. नायरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नायरचे हे या हंगामातील सलग चौथे आणि पाचवे शतक ठरले आहे. त्याने ८२ चेंडूंत १३ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी साकारली.

नायरने लिस्ट ए स्तरावर सलग चार शतके झळकावून कर्नाटकच्या माजी सहकारी देवदत्त पडिक्कल, श्रीलंकेच्या माजी कर्णधार कुमार संगकारा, आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज अल्विरो पीटरसन यांच्या बरोबरीचे प्रदर्शन केले आहे. लिस्ट ए मधील सलग सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम सध्या नारायण जगदीसन यांच्या नावावर आहे, ज्यांनी २०२२-२३च्या विजय हजारे ट्रॉफी हंगामात सलग पाच शतके झळकावली होती.

करुण नायरच्या सलग पाच सामन्यांमधील चौथे शतक झळकावून राजस्थानच्या गोलंदाजांना अडचणीत आणले. ३३ वर्षीय नायरने या हंगामात आठ सामन्यांतील सहा डावांत ६६४ धावा केल्या आहेत आणि तो फक्त एकदाच बाद झाला आहे. त्याची सरासरी ६६४ आहे. याआधी, मिझोरामविरुद्धच्या सामन्यात विदर्भाने १० विकेट्सने विजय मिळवताना नायरला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

नायरच्या गेल्या तीन सामन्यांतील धावसंख्या – उत्तर प्रदेशविरुद्ध ११२, तामिळनाडूविरुद्ध नाबाद १११, आणि चंदीगडविरुद्ध नाबाद १६३ – एकूण ६६४ धावांसह, तो आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. २०१६ मध्ये भारतासाठी कसोटीत त्रिशतक झळकावल्यानंतर नायरला काही काळ संघाबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, त्याचा लिस्ट-ए फॉर्म आणि सातत्याने केलेली धावसंख्या त्याच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण करत आहे.