पाबळ येथे अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पाटील यांनी भाषण थांबवले.
सध्या लोकसभा निवडणुक जवळ आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालायला सुरूवात केली आहे. अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. यामुळे शरद पवारांसाठी सुद्धा शिरूर लोकसभेची जागा निवडूण आणणं हे प्रतिष्ठेचं झालं आहे.
याबाबत स्वत: शरद पवार यांनी मंचर येथे सभा घेतली आहे. त्याचाच परिणाम आज दिसला आहे का? अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. पाणी प्रश्नासंदर्भात अनेक गावांचे शेतकरी नाराज असल्याचे तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. यामुळे शरद पवार यांच्या नावाने घोषणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यामुळे निवडणुकांमध्ये वळसे पाटील यांना फटका भोगावा लागणारे आहे का? अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील यांनी भाषण सुरू केलं तेव्हा कालव समितीच्या पाणी प्रश्न संदर्भात शेतकरी आणि तिथल्या ग्रामस्थांना माहिती देत होते.
यावेळी शेतकऱ्यांनी भाषण सुरू असतानाच घोषणा द्यायला सुरूवात केली. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. नंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपले भाषण थांबवले. ते म्हणाले, तुमचं जेवढं प्रेम शरद पवार साहेबांवर आहे, तेवढच प्रेम माझ पण आहे. मी ४० वर्ष शरद पवार यांच्या सोबत काम केले आहे.
तसेच ते म्हणाले, काही राजकीय प्रश्न असतात म्हणून निर्णय घ्यावा लागतो. ते आता मी इथे बोलत नाही. असं म्हणत त्यांनी आपलं भाषण आटपत घेतलं, यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.