पुणे अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. आता या प्रकरणाकडे केवळ राज्य नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एक बडा मासा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे.
अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता मोठा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. यामुळे तपासाला अजूनच गती मिळणार आहे. दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे.
या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका धनाढ्य व्यक्तीच्या मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी नियम धाब्यावर बसवून काम करु शकते, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.