Crime news : बाप-लेकाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापानेही सोडले प्राण

Crime news : नागपूर शहरातील धरमपेठ भागात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. ब्रेन हॅमरेजने मृत्यू झालेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे वडीलही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मोहित मोहन चंदेले ४१ वर्षांचा होते. तो आईसक्रीम कंपनीचा डिलर होता. त्याला काही दिवसांपूर्वी मेंदूमध्ये रक्तात गुठळ्या तयार झाल्याचे निदान झाले होते. त्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना सोमवारी त्याला ब्रेन हॅमरेजचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोहितच्या मृत्यूची बातमी त्यांचे वडील मोहन शंकरलाला चंदेले वय ७५ यांना अर्ध्या तासाने सांगण्यात आली. मात्र, मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच मोहन यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांचा श्वास थांबला. मुलाच्या निधनानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हा प्रकार घडला.

मोहन हे टेलिफोन विभागातून निवृत्त झाले होते. त्यांना पूर्वीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्या हृदयावर दोनवेळा शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. अशातच घरातील करता मुलगा गेल्याचं समजल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही.

मोहित आणि मोहन या दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील दोन्ही पुरुषांचं अशाप्रकारे अचानक निधन झाल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. चंदेले यांच्या घरातून एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृश्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले.

पार्थिव अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत नेण्यासाठी उचलल्यानंतर घरातील महिलांनी एकच हंबरडा फोडल्याने अनेकांच्या अंगावर शहारा आला. मंगळवारी या बाप-लेकांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.