Crime News : गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. ही घटना गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. शेजाऱ्यांनी संशय आल्यावर त्यांनी तरुणीच्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडली आहे. गोरखपूरमध्ये राहणारी एक दहावीची विद्यार्थिनी एका तरुणाच्या प्रेमात होती. तरुण तिच्या घरी येत असे. पण ही गोष्ट तिच्या पालकांना समजू नये म्हणून ती त्यांना झोपेच्या गोळ्या देत होती.
तरुणी रोज रात्री आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स करून त्यांना खायला देत होती. जेव्हा तिचे आई-वडील गाढ झोपेत असत तेव्हा ती प्रियकराला घरी बोलवत होती. प्रियकर घरी आल्यावर तो तिच्यासोबत वेळ घालवत असे आणि लवकरच घरी निघून जात असे.
शेजाऱ्यांनी याबाबत तरुणीच्या पालकांना सांगितले. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी एकदिवस जेवण केल्याचे नाटक केले. त्यानंतर ते पांघरुण घेऊन झोपून राहिले. तरुणीने त्यांना झोपल्याचे पाहून प्रियकराला घरी बोलवले. युवक घरी आल्यावर तरुणीचे वडील उठले आणि त्यांना रंगेहाथ पकडले.
तरुणीच्या वडिलांनी युवकाला मारहाण केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारीही आले. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही समजावून सांगितले. या प्रकरणात आत्तापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांनी तरुणीच्या कृत्याचा निषेध केला आहे. तरुणीच्या पालकांनीही तिच्यावर खूप नाराजगी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.