सध्या सायबर क्राईमच्या अनेक घटना घडत आहे. लोकांना फोन येतात आणि अचानक बँकेतील अकाऊंटमधील पैसे गायब होतात. अनेकांची खाती अशाप्रकारे रिकामे झाली असून मुंबईत याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
गुंतवणूकीवर चांगला मोबदला देतो, असे म्हणत सायबर क्राईम गुन्हेगार लोकांची खाती रीकामी करताना दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये दहिसर, शिवाजीनगर, मुलुंड, अंधेरी, घाटकोपर यांसारख्या अनेक भागातून १२ पेक्षा जास्त लोकांची खाती रिकामी करण्यात आली आहे.
याप्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांना खबरदारी ठेवण्याची खुप गरज आहे. घाटकोपर येथील एका २४ वर्षीय तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे.
देबायन असे त्या तरुणाचे नाव आहे. तो बीकेसी येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. त्यामध्ये त्याला रिकाम्या वेळेत काम करण्याचे पैसे दिले जाणार असे सांगितले. पैसे भेटतील यामुळे त्या तरुणाने एक टेलिग्राम ग्रुप जॉईन केला होता.
त्याठिकाणी तरुणाने आपल्या बँकेतील खात्याची माहिती दिली. सुरुवातीला त्याला काही टास्क देण्यात आले, ते पुर्ण केल्यानंतर काही रक्कम त्याच्या बँकेत जमा करण्यात आली. त्यामुळे त्याचा यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याला पेड टास्कवर काम करण्यास सांगितले.
पेड टास्क म्हणजे पैसे भरुन खेळायचे. यामध्ये जास्त परतावा मिळेल या आशेने तो खेळत होता. त्याने थोडे थोडे करुन तब्बल ९ लाख ८५ हजार रुपये पैसे गुंतवले. पण पैसे काढता येत नसल्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले आहे.
तसेच दहिसरच्या एका तरुणीला इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक आणि शेअर करण्याचे टास्क देण्यात आले होते. प्रत्येक स्क्रीनशॉट मागे तिला ५० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर कंपनीवर तिचा विश्वास बसला. तिलाही पेड टास्कचे काम देण्यात आले. यामध्ये तिचीही ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
घ्यायची खबरदारी-
१. घरबसल्या हजारो रुपये कमवा, असे कोणीही सांगत असेल तर तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. त्या कामाला नकार दिला पाहिजे.
२. फक्त पोस्टला लाईक करुन आणि शेअर करुन पैसे मिळत नाही.
३. कोणत्याही लिंकवर क्लिक करणे धोकादायक ठरु शकते.
४. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांचा ग्रुप जॉईन करु नका.
५. रोजगार देणारे कधीही पैशाची मागणी करत नाही, त्यामुळे जर कोणी असे करत असेल तर तुमची फसवणूक होतेय हे लक्षात घ्या.
६. अनोळखी लोकांना तुमच्या बँक डिटेल्स देऊ नका.