सख्ख्या दाजीनेच आंदेकरचा गेम केला? पुणे माजी नगरसेवक हत्या प्रकरणी भयंकर माहिती समोर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. भररस्त्यावर हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवामुळे रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नाना पेठेमध्ये हा गोळीबार करण्यात आला.

रात्री 9 च्या सुमारास नाना पेठ परिसरामध्ये आंदेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर आंदेकरवर कोयत्याने वारही करण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यामुळे पुण्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदेकरला गोळ्या लागल्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याला मृत घोषित करण्यात आलं.

याबाबत माहिती अशी की, वनराजचे वडील बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा इतिहास आहे. बंडू आंदेकरसह इतर सहा जणांवर गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत आरोप ठेवण्यात आले होतं, पण याप्रकरणी जामीन मिळाला होता.

दरम्यान, घरगुती वादातून बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ऍसिड हल्ला केला होता. यामुळे पोलीस त्यादृष्टीने देखील तपास करत आहेत.

तसेच उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस सध्या आरोपींना ताब्यात घेत आहेत.

दरम्यान, आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, नंतर त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचे बोलले जात आहे. आता पोलीस तपास करत आहेत.