वेषांतर करून आले, अन् बैठकीला दांडी मारून निघून गेले, साताऱ्यात उदयनराजे यांनी नेमकं केलं काय?

सातारा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. यामुळे उदयनराजे यांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला थांबले नाहीत. ते शेतकरी वेशात आल्याचे सांगितले जाते. याबाबत पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, त्यांना महत्त्वाच्या बैठका होत्या, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या झाली.

या मतदारसंघातून उदयनराजे इच्छुक असून याबाबत त्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली. यावेळी परत आल्यावर साताऱ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र इच्छुक असलेले खासदार उदयनराजे मात्र बैठकीला थांबले नाहीत. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे.

यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील देखील अनुपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांना महत्त्वाच्या बैठका होत्या. उदयनराजे या ठिकाणी येऊन गेले. त्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाली, असे देसाई यांनी सांगितले.

या बैठकीला सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भेासले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, अमित कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत पाटील, सुरभी भोसले, शारदा जाधव उपस्थित होते.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघात भाजप आणि शरद पवार यांच्याकडून अजून उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे अशी लढत होईल, असेही सांगितले जात आहे.