रस्त्यावरून झाला वाद, चक्क भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, धक्कादायक प्रकार आला समोर…

अनेकदा शेतातील बांधावरून किंवा घराशेजारील भीतीवरून अनेकदा वाद होताना दिसून येतो. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेमुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली आहे. यामुळे उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, खारकर आळीमध्ये खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारीच राहतात.

खंडू खारकर यांचे ४ जानेवारीला निधन झाले. अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता रस्ता सुरू करण्याबाबत विचारणा केली. त्यांचा मुलगा नीतेश यांनी त्याला नकार दिला. अनेकांनी त्याला समजावले मात्र फायदा झाला नाही.

यामुळे भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा काढण्यात आली. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांत संतापले. प्रशासनाने जर वेळीच लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

यामुळे या वागणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या प्रकरणात आता तहसीलदारांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे. मात्र गरजेच्या वेळी तरी माणुसकी दाखवावी, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, हा रस्ता खुला व्हावा, यासाठी खारकर आळीतील ग्रामस्थांनी वासांबे ग्रामपंचायत, खालापूर पंचायत समिती, खालापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज दिले होते. तसेच उपोषण देखील केले होते. मात्र तरीही हा रस्ता खुला करण्यात आला नाही.