विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि समाजवादी पक्षामध्ये वाद उफाळल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार टाकला होता, मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि रईस शेख यांनी स्वतंत्र भूमिका घेत शपथ घेतली. यामुळे समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे आणि त्यांची भूमिका समाजवादी पक्षासाठी स्वीकारार्ह नसल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन करणाऱ्या पक्षासोबत राहणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. “समाजवादी पक्ष सेक्युलर विचारांचा आहे. आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षांसोबत कसे राहणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अबू आझमींवर टीका करताना, “आझमी भाजपची बी टीमसारखे वागतात,” असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना रईस शेख म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ठाकरेंच्या उमेदवारांसाठी प्रचार केला, तेव्हा आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्याची आठवण ठाकरेंना झाली नाही का?”
अबू आझमी आणि रईस शेख यांनी शपथ घेतल्याने महाविकास आघाडीत एकीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि समाजवादी पक्षातील वाढत्या वादामुळे आघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडीतील हे वाद राजकीय समीकरणांवर कोणता प्रभाव टाकणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच महाविकास आघाडीत समन्वयाची कमतरता असल्याचेही या वादावरून उघड झाले आहे.