Dunki Review: वर्षाच्या शेवटला राजकुमार हिरानीने शाहरुख खानला घेऊन डंकी सारखा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. चित्रपट पाहताना एक चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळतंच पण तरीही खास ‘राजकुमार हिरानी टच’ या चित्रपटात हरवला आहे, असे अनेकांना वाटत.
चित्रपटगृहातून बाहेर पडताना अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राजकुमार हिरानी हे नाव घेतलं की प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात कारण त्यांचे चित्रपट हे फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत, तर त्यांच्या चित्रपटांचे विषय, मांडणी आणि सादरीकरण उत्तम असते.
चित्रपटात पंजाबमधील तरुणांमध्ये बाहेरील देशांत लंडनमध्ये स्थायिक व्हायचं वेड, त्यामागची त्यांची पार्श्वभूमी, गरज ही गोष्ट चित्रपटात मांडली आहे. तिथल्या तरुणांची शिक्षणाबाबतीतली अनास्था, इंग्रजीबद्दलचं अज्ञान पण बाहेरील देशात जाऊन पडेल ते काम करून चांगलं जीवन जगायची जिद्द अस काहीसं यामध्ये आहे.
पुढे डाँकी फ्लाईटसारख्या अवैध मार्गांचा वापर करणं हे या कथेत मांडले आहे. राजकुमार हिरानी यांचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, किंवा ‘ ३ इडियट्स’ संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आजही भावुक करतात तसं लिखाण हिरानी यांच्या ‘पीके’पासूनच्या चित्रपटातून हरवलंच आहे, अस अनेकांचे म्हणणे आहे.
‘डंकी’बाबत बोलायचं झालं तर त्या दर्जेदार लिखाणाची कमतरता भासते. लिखाणात या चित्रपटाने चांगलाच मार खाल्ला आहे. अवैध घुसखोरी करणाऱ्या लोकांची गरज समजावून देण्यासाठी शाहरुख खानचं एक बाळबोध भाषण, त्या घुसखोरी करणाऱ्या लोकांची दहशतवाद्यांशी केली गेलेली तुलना, असं काहीसं आहे.
ही जमीन परमेश्वराची आहे अन् केवळ माणसाने सीमारेषा आखल्याने त्यावर आपली मालकी सिद्ध होत नाही. या आशयाचे संवाद कथेचं गांभीर्य घालवतात, याबाबतच्या प्रतिक्रिया लोकांकडून आल्या आहेत.