गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक भुकंप होत आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले, त्यानंतर अजित पवारांनी बंड करत भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये जागा मिळवली.
अशात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. ते तिथे भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच एनडीएची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे पुन्हा मोठ्या घडामोडी होण्याची चर्चा आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशीही चर्चा रंगली आहे.
एनडीएची जेव्हा बैठक झाली होती, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्मंत्री अजित पवार हे तिथे गेले होते. यावेळी दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाईनमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार हे अमित शहांच्या बाजूला बसलेले होते.
बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. त्याचवेळी नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शहा यांनी अजित पवारांसोबत अर्धातास चर्चा केली होती. अजित पवारांच्या या बैठकीबाबत माहिती मिळाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चां सुरु झाल्या होत्या.
असे असताना एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहे. या दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच ते एका खाजगी कार्यक्रमासाठी जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान, आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री अजित पवार म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. तसेच अमोल मिटकरींनी तर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असे ट्विटही केले आहे.