Eknath Shinde : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) ठाकरे गटाला धक्के देण्यासाठी सक्रीय झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीत सामील होण्यासाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत मोठे राजकीय इनकमिंग?
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात सूचक वक्तव्य केले होते. काही माजी आमदार आणि खासदार शिवसेना (शिंदे गट) प्रवेशासाठी संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला वेग आल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे रविंद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार?
काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातील बडे नेते रविंद्र धंगेकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ते ठाकरेंच्या बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडले होते. विशेष म्हणजे धंगेकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.
हुसेन दलवाई यांनी जरी पक्षप्रवेशाच्या चर्चांना फेटाळले असले तरी धंगेकरांच्या हालचालींमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता बळावली आहे.
शिंदे गटात सामील होणाऱ्या संभाव्य नेत्यांची नावे पुण्यातील रविंद्र धंगेकर – काँग्रेसचे माजी आमदार, महादेव बाबर – ठाकरे गटाचे माजी आमदार, हडपसर, चंद्रकांत मोकाटे – ठाकरे गटाचे माजी आमदार, कोथरूड
रत्नागिरीतील गणपत कदम – ठाकरे गटाचे माजी आमदार रत्नागिरी, संगमेश्वर, अहिल्यानगरमधील ,सुभाष बने – ठाकरे गटाचे माजी आमदार, संगमेश्वर आणि नवी मुंबई मधील रमाकांत म्हात्रे – काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर
राजकीय हालचालींना वेग
या नेत्यांचे शिंदे गटात प्रवेश लवकरच निश्चित होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. महायुतीच्या रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी शिंदे गट नव्या इनकमिंगवर भर देत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.