Filmfare : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईतले अनेक उद्योग गुजरातला नेले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात असताना आता मुंबईचा मानाचा फिल्मफेअरही गुजरातमध्ये होणार आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 69 व्या Hyundai Filmfare Awards 2024 संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
हा पुरस्कार सोहळा गिफ्ट सिटी, गांधीनगर, गुजरात येथे होणार आहे. २०१८ पासून २०२३ पर्यंत प्रत्येक वर्षी फिल्मफेअर पुरस्कार हे मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत होते. २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटी येथे झाला होता. मात्र आता २०२४ चा फिल्मफेअर सोहळा गुजरातला होणार आहे.
करण जोहर स्वतः या पुरस्कारसंध्येचे सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या दिवशी फॅशन शो आणि दुसऱ्या दिवशी अवॉर्ड फंक्शन आणि डान्स नाईट होईल. यामध्ये करीना कपूर खान, कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग यांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
तसेच करण जोहरसोबत मनीष पॉल आणि आयुष्मान खुराना हे शो होस्ट करताना दिसणार आहेत. फिल्म फेअरच्या पहिल्या दिवशी निखिल आणि शंतनूचा फॅशन शो आणि दुसऱ्या दिवशी अवॉर्ड नाईट होईल. तुम्हालाही या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावायची असेल तर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.
या कार्यक्रमाला हरित शुक्ला (IAS, प्रधान सचिव, पर्यटन, देवस्थानम व्यवस्थापन, नागरी विमान वाहतूक आणि तीर्थक्षेत्र, गुजरात सरकार), रोहित गोपकुमार (संचालक, टाइम्स एंटरटेनमेंट विभाग, वर्ल्डवाईड मीडिया, एंटरटेनमेंट टीव्ही आणि डिजिटल नेटवर्क) आणि जितेश पिल्लई (संचालक) उपस्थित होते.
फिल्मफेअरच्या 69 व्या आवृत्तीबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले, फिल्मफेअर पुरस्कारांच्या प्रतिष्ठित ६९ व्या आवृत्तीसाठी गुजरातमध्ये चित्रपट निर्मात्यांचे स्वागत करण्याची तयारी गुजरातने केली आहे. आम्हाला पर्यटनात वाढ आणि आमच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे.
आम्ही गुजरातचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, मजबूत पायाभूत सुविधा तसेच आमचे सक्रिय प्रशासन आणि सिनेमॅटिक टुरिझम पॉलिसी आणि गुजरात टुरिझम पॉलिसी यांसारख्या धोरणांचे प्रदर्शन करण्यास देखील उत्सुक आहोत.
फिल्मफेअरबद्दल वरुण धवन म्हणाला, फिल्मफेअर अवॉर्ड्स हे भारतीय सिनेमाच्या हृदयाचे ठोके आहेत, जे अनेक कलाकारांना नवीन उंचीवर घेऊन जातात. जेव्हा मी माझ्या पहिल्या परफॉर्मन्सकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसतं की गोष्टी बदलल्या आहेत.