गावखेडं असो वा शहर प्रवासासाठी लोकांना लालपरीच लागत असते. पण अनेकदा लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. अनेकजण याबाबत तक्रारही करताना दिसून येतात. अशाच एका लालपरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
एका बसचे छतच उडाले असून ते वाऱ्यामुळे हवेत उडताना दिसून येते. संबंधित व्हिडिओ हा गडचिरोलीमधला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बसची भयानक अवस्था झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या राज्यात अनेक बस अशा आहेत, ज्यांच्या छतातून पाणी गळते. अशात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बसेस दुरुस्त करण्याची गरज आहे. असे असताना या बसचे छप्पर बस धावत असताना थेट उडताना दिसत आहे.
ती बस गडचिरोलीकडून अहेरीकडे जात होती. चामोशी मार्गावर हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. या अवस्थेत बस अनेक किलोमीटर धावली सुद्धा. त्यानंतर जेव्हा चालकाला बसचे छप्पर उडत आहे हे सांगितल्यावर त्याने बस एका ठिकाणी थांबवली.
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी तर बसेस सुधारण्याची नाही, तर नव्या आणण्याची गरज आहे, असा सल्ला एसटी महामंडळाला दिला. तर एकाने हे अजय देवगणच्या केसासारखे छप्पर उडत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील काही बसेसची भयानक अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी येवल्या जवळच्या वैजापूरमधून एक घटना समोर आली होती. त्यामध्ये एका बसचे चाक अचानक तुडून पडले होते. त्याचा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता.